नाशिक : येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजावतरण गुरुवार, दि. ११ रोजी होणार असून, या ध्वजावतरण कार्यक्रमासाठी नाशिक पुरोहित संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यानिमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी नाशिककरांतर्फे आमदार बाळासाहेब सानप यांनी, तसेच गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि सिंहस्थ नागरी समितीतर्फे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, अॅड. भानुदास शौचे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, महादेव जानकर, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार राम कदम व सर्वपक्षीय विविध मान्यवरांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले, असून मान्यवरांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.कुंभमेळ्याच्या ध्वजावतरणप्रसंगी जगद्गुरू षष्ठपीठाधिश्वर वल्लभरायजी महाराज, सुरत, जगद्गुरू, महंत नरेंद्रचार्य महाराज, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे तसेच शैव व वैष्णव संप्रदायाच्या आखाड्यांचे साधू, संत, महंत यांच्या उपस्थितीत दुपारी २.३० वाजता शोभायात्रा, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथून निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सिंहस्थ कुंभमेळ्यातील विविध संस्था व कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ जुने भाजीबाजार पटांगण, दुतोंड्या मारुतीजवळ, पंचवटी येथे होईल. रात्री ९.३१ वाजता मान्यवर व साधू, संत, महंत, नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजावतरण कार्यक्रम होईल, अशी माहिती सतीश शुक्ल यांनी दिली. (प्रतिनिधी)
देवेंद्र फडणवीस यांना ध्वजावतरणाचे निमंत्रण
By admin | Published: August 08, 2016 12:50 AM