नाशिक : महापालिकेच्या गौळाणे शिवारातील खतप्रकल्पाभोवती साठविल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ढीगामुळे परिसरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुत्र्यांच्या झुंडी बिबट्याला या भागात येण्यास निमंत्रण देत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून पांडवलेणी ते पाथर्डी शिवारापर्यंत बिबट्याचा संचार वाढला आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणल्यास बिबट्यासाठी सहज सोपी शिकार कमी होईल आणि बिबट्या आपला अधिवास बदलू शकतो, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पांडवलेणीच्या डोंगरावर आठवडाभरापूर्वी ट्रेकिंग करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला बिबट्याने पंजा मारल्याची घटना घडली होती. सुदैवाने या घटनेत तरुण किरकोळ जखमी झाला. तसेच पाथर्डी शिवारातदेखील बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त होत आहेत. यामुळे पाथर्डीमधील वाडीचे रान परिसरातील मळे भागात वनविभागाकडून पिंजराही लावण्यात आला आहे.पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरदेखील बिबट्याने शेतकºयांना दर्शन दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वी विल्होळी, पिंपळगाव खांब, वडनेर भैरव या भागातही बिबट्याचा संचार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाच्या परिसरासह पांडवलेणी डोंगराचा भाग राखीव वनक्षेत्र आहे. हा परिसर वनविकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. या भागात नागरिकांची कायम वर्दळ असते. वनोद्यान, पांडवलेणी, फाळके स्मारक, बौद्ध स्मारक या वास्तू असल्याने येथे पर्यटक व नागरिकांची नेहमी रेलचेल पहावयास मिळते.बिबट्या हा वन्यप्राणी मिळेल ते खाद्य खाऊन उपलब्ध अधिवासासोबत जुळवून घेणारा वन्यजीव आहे. त्यामुळे बिबट्याचे खाद्य हे मर्यादित स्वरूपात राहिलेले नाही. कोंबडीपासून कुत्र्यापर्यंत बिबट्या प्राण्यांची शिकार सहज करतो.कुत्रा हा शहरी भागात आढळून येणारा प्राणी त्याच्यासाठी अत्यंत सोपी शिकार ठरते. त्यामुळे कुत्रा बिबट्याचे आवडीचे खाद्य असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात.उत्तम नैसर्गिक अधिवासडोंगर आणि सभोवताली असलेल्या झाडाझुडपांच्या राखीव वनक्षेत्रामुळे बिबट्याला उत्तमरीत्या नैसर्गिक लपण उपलब्ध आहे. यामुळे या भागात बिबट्या वास्तव्य करून राहू शकतो, कारण नैसर्गिक सुरक्षित अधिवासासोबत कुत्र्यासारख्या प्राण्यांची साधी-सोपी शिकारदेखील मुबलक प्रमाणात त्याच्यासाठी आहे. त्यामुळे या भागात नागरिकांनी प्रवेश करताना अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
भटक्या श्वानांच्या झुंडीने बिबट्याला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:42 AM