नाशिकरोड : आंबेडकररोडवरील गेल्या काही वर्षांपासून धोकादायक पडक्या स्थितीत असलेल्या डुबेरकर इमारतीच्या तळ मजल्याच्या सहा दुकानांवरील लोखंडी सांगाडा व कॉँक्रीटचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.आंबेडकररोडवरील दोन मजली असलेल्या जुन्या डुबेरकर इमारतीचा वरचा मजला काही वर्षांपूर्वीच पडला आहे. तळमजल्यावर दुकाने असून, तेथील व्यावसायिक व संबंधित जागा-इमारत मालक यांच्यात समेट होत नसल्याने त्या धोकेदायक इमारतीच्या तळ मजल्यावर काही दुकाने सुरू आहेत. शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक तळमजल्यावरील सहा दुकानावरील लोखंडी सांगाडा व कॉँक्रीटचा काही भाग अचानक दुकानापुढील भागात आवाज करत कोसळला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी अथवा दुर्घटना घडली नाही. मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. धोकेदायक डुबेरकर बिल्डिंग मालक व संबंधित दुकानदार यांच्यात जागा खाली करण्यावरून वाद निर्माण झाल्याने त्या धोकेदायक इमारतीत काही व्यावसायिक आपला व्यवसाय करीत आहे. मनपा अधिकारी व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे.
धोकादायक इमारतीचा लोखंडी सांगाडा कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:57 AM