नाशिक : तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रभू रामचंद्र वनवास काळात शहरातील तपोवनात काही काळ वास्तव्यास होते. या परिसराला धार्मिक पौराणिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने देशभरातील पर्यटकांची या ठिकाणी कायम वर्दळ असते. पूल ओलांडून टेकडीवर असलेल्या राम, सीता, लक्ष्मण यांच्या प्रतिमेच्या भव्य प्रतिकृतींसोबत सेल्फी काढण्यासासाठी पर्यटक जात असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या प्रतिकृतींजवळ पोहचण्यासाठी हा लोखंडी पुलाचा एकमेव मार्ग आहे. सध्या नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून, मागील महिन्यात आलेल्या पुरामुळे या पुलाची दुरवस्था होऊन पुलाचा मार्ग धोकादायक बनला आहे. पुलावर टाकलेले लाकडी बांबूही पाण्याने भिजून कमकुवत झाले आहेत. तर काही लाकडी फळ्या तुटल्या आहेत. याबरोबरच लोखंडी पुलाला असलेल्या साखळ्यांचे संरक्षण ही तुटले आहे. एकूणच या पुलावरून मार्गस्थ होताना कुठलाही आधार राहिलेला नाही. केवळ तोल सांभाळत धाडस करून तरुण ये-जा करताना दिसत आहे. मात्र अनवधानाने लक्ष विचलित होऊन किंवा पाय घसरून तोल गेल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी बॅरिकेड लावावे; पर्यटकांनी दक्षता घ्यावीशहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असून, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रविवारी दिवसभर तसेच सोमवारी पहाटेपर्यंत पाऊस जोरात सुरू असल्यामुळे धरणातून विसर्गही वाढविला गेला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २३ मि.मी. इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला. सध्या धरणातून ३१२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, होळकर पुलापासून पुढे तपोवनापर्यंत साडेचार हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी प्रवाहित आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत हा पूल बंद ठेवण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी पुलाच्या प्रारंभी बॅरिकेड लावण्याची गरज आहे. पावसाळ्यानंतर महापालिकेने सदर पुलाची पुन्हा दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
लोखंडी पूल धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:04 AM