नाशिक : प्रभागात ठरवून दिलेल्या वेळेत घंटागाडी न पाठविणे, दोन-तीन दिवसाआड घंटागाडी फिरविणे, पुरसे कामगार नसणे आदिंसह विविध कारणांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित घंटागाडी ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडून दंडात्मक स्वरूपात चार लाख ६६ हजार ८०० रुपयांची वसुली केली आहे. दरम्यान, घंटागाडीच्या वाढत्या तक्रारी पाहता जूनमध्ये ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच फेबु्रवारीतच संबंधित ठेकेदारांच्या हातात नारळ देण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. नाशिक शहरातील सर्व प्रभागांमध्ये महापालिकेकडून १६५ घंटागाड्या फिरविल्या जातात. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या ११५ घंटागाड्या असून, त्या संबंधित ठेकेदारांना पालिकेने भाड्याने दिल्या आहेत. त्यासाठी पालिकेला दरमहा प्रतिवाहन आठ हजार रुपये भाडे मिळते. प्रभागांमधून कचरा गोळा करून आणत तो खत प्रकल्पावर नेण्यासाठी पालिका संबंधित ठेकेदाराला १३२० ते १३५२ रुपये प्रतिटन रक्कम अदा करते. शहरात चार ठेकेदारांकडून घंटागाडीचा ठेका चालविला जात आहे. दरम्यान, घंटागाडी वेळेवर न येणे, वाहन नादुरुस्त झाले असेल तर पर्यायी गाडी उपलब्ध करून न देणे, घंटागाडीवर वाहनचालकासह तीन कामगार आवश्यक असताना पुरेसे कामगार नसणे, अनियमितता, कचरा न उचलणे आदि विविध कारणास्तव आरोग्य विभागाने सहाही विभागांचा आढावा घेऊन घंटागाडी ठेकेदारांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करत त्यांच्याकडून चार लाख ६६ हजार ८०० रुपयांची वसुली केली. दंडाची कारवाई पाहता पूर्व, सातपूर व पंचवटी या विभागांत जास्त तक्रारी असल्याचे लक्षात येते. ठेकेदाराने पर्यायी गाडी उपलब्ध करून न दिल्यास प्रतिदिन दोन हजार रुपये, गाडी न फिरविल्यास प्रतिदिन तीन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. शहरातील संबंधित घंटागाडी ठेकेदारांचा ठेका १० जून २०१५ रोजी संपत असून, घंटागाडीसंबंधी वाढत्या तक्रारी लक्षात घेता आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीतच संबंधित ठेकेदारांना नारळ देऊन नव्याने ठेका देण्याचे सूतोवाच आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
अनियमित घंटागाडी; ठेकेदारांना दंड
By admin | Published: December 04, 2014 12:39 AM