दिंडोरी (भगवान गायकवाड ) : गेल्या वर्षी परतीचा पाऊस लांबत सरासरी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत असल्या तरी तालुक्यातील आठ ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा उद्भव आटल्याने पाणीटंचाई जाणवू लागताच तालुका प्रशासनाने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहण करत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. मात्र सदोष नळ-पाणीपुरवठा योजनांमुळे अनियमित पाणीपुरवठ्याचा जाच तालुकावासीयांना सहन करावा लागत असतो.दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावात नळ पाणीपुरवठा योजना राबवली गेली आहे मात्र काही ठिकाणी सदोष पद्धतीने योजना झाल्याने तसेच विजेच्या लोडशेडिंगमुळे काही गावांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी कूपनलिका नादुरुस्त असून, वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने अडचण होत असल्याच्या तक्रारी आहेत. दिंडोरी शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर येथे कूपनलिकेवर पाण्यासाठी नेहमी गर्दी असते. येथील नागरिकांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी आहे.भारत निर्माण योजना ही वादग्रस्त ठरली असून, काही ठिकाणी या योजनेबाबत तक्रारी होऊन फौजदारी कारवाईही झाली आहे. जीवन प्राधिकरणच्या काही योजनांचेही काम ९० टक्के पूर्ण होऊन त्या कार्यान्वित झालेल्या नाहीत. राष्ट्रीय पेयजल असो की भारत निर्माण दोन्ही योजना होऊन काही दिवसातच त्या दुरुस्तीवर आल्याच्याही तक्रारी आहेत. तालुक्यात सात धरणे, १५ लघु पाटबंधारे व अनेक पाझर तलाव असून, ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील ४४ गावे वणी, दिंडोरी या शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हे धरण गेले चार वर्षे सलग भरल्याने पाणीटंचाई जाणवत नाही. पालखेड धरणातून पिंपळगाव बसवंत, ओझर, मोहाडी, साकोरे, जानोरी या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असून, धरणात पाणी असल्याने टंचाई नाही.------पंचायत समितीतर्फे टंचाई कृती आराखडा बनवत त्यावर कार्यवाही केली आहे. आठ गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींचे पाणी कमी झाले होते. त्यामुळे तातडीने खासगी विहीर, कूपनलिका अधिग्रहित केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. तालुक्यात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.- चंद्रकांत भावसार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी
सदोष योजनांमुळे अनियमित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:18 PM