लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरातील विजयनगर व कानडी मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन ते चार दिवसांनी शहरातील अन्य भागांप्रमाणे नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज जाधव यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. विजयनगर, सोनवणे मळा, बॅँक कॉलनी, गजानन चौक, कानडी मळा या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाच ते सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना वारंवार टॅँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागते. सिन्नर शहरातील इतर भागात दोन ते तीन दिवसांनी सुरळीत व ठरलेल्या वेळेत पुरेसा पाणीपुरवठा केला जातो, मग आमच्या भागावरच गेल्या अनेक महिन्यांपासून अन्याय का केला जात आहे, असा प्रश्न जाधव यांनी आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.
-----------------------------
उन्हाळा सुरु होत असल्याने पुढील काळात पाण्याचे दुर्भीक्ष भासणार आहे. त्यामुळे आगामी काळात विजयनगर, सोनवणे मळा, बॅँक कॉलनी, गजानन चौक, कानडी मळा या भागातील पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित करुन ठराविक वेळेत नियमित दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जावा. तसेच या भागातील बहुतांशी पथदीप व हायमास्ट बंदावस्थेत असून, ते तातडीने सुरू करावेत, अशी मागणी जाधव यांनी निवेदनातून केली आहे.