कळवण : कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील सतखांब, वांगण आणि लाडगाव या प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण-सुरगाणा तालुक्यातील साठवण तलाव व को.प.बंधारे या योजनांबाबत आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. भरणे म्हणाले, कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी प्राप्त व्हावा यासाठी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे जलसंधारण आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव यांची संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेणार असल्याचे माहिती यावेळी भरणे यांनी दिली. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाकरिता निधी उपलब्ध करून प्रथम प्राधान्याने लपा तलाव सतखांब, वांगण व इतर लघु प्रकल्प मार्गी लावावे, सध्या स्थितीत सुरगाणा तालुक्यातील लपा योजना राबवितांना ३.५० एम.सी.एफ.टी. पाण्याचे नियोजन आहे ते वाढीव करून सुरगाणा तालुक्यात साठी किमान 5 एम.सी.एफ.टी.पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नितीन पवार यांनी केली. उवर्रीत दहा लघु पाटबंधारे प्रकल्पांचे अंदाज पत्रक सादर करण्याचे निर्देश भरणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी देऊन आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाच्या योजनांसाठी जलसंधारणासह आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करुन देऊ व आगामी काळात कळवण व सुरगाणा तालुक्यात जलक्रांती घडवू असा विश्वास भरणे यांनी यावेळी व्यक्त केला. सदर बैठकीत सुरगाणा तालुक्यातील गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव,को.प. बंधारे इत्यादी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.