नाशिक : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ची सांगता मंगळवारी (दि.११) संध्याकाळी होऊन इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४० ला प्रारंभ होणार आहे. सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शनाची शक्यता होती; मात्र चंद्रदर्शन घडले नसल्याने नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला प्रारंभ होऊ शकला नाही. इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊन महिना बदलला जातो. चंद्रदर्शन न घडल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करुन पुढचा महिन्याला सुरूवात होते. तसेच उर्दू कालगणनेचा दिवस संध्याकाळी सुर्यास्तापासून बदलतो. मुंबईसह संगमनेर, मालेगावमधूनही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही स्थानिक चांद समितीला प्राप्त होऊ शकली नाही, त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पुर्ण करुन मुहर्रम महिन्याला अर्थात इस्लामी नववर्षाला मंगळवारी संध्याकाळपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. हिजरी सन १४३९चा अखेरचा महिना ‘जिलहिज्जा’ची सोमवारी २९ तारीख होती; मात्र चंद्रदर्शन कोठेही घडू शकले नसल्याचे चांद समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार यांनी सांगितले.मुहर्रम, गणेशोत्सव सोबतचयावर्षी मुहर्रम आाणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. राष्टÑीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा कायम जोपासावा असाच संदेश दोन्ही समाजांसाठी हा योग देऊन जाणारा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवदेखील बारा दिवस साजरा होतो आणि मुहर्रमचे सुरूवातीचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या कालावधीत करबलाच्या स्मृती जागविल्या जातात. ठिकठिकाणी प्रवचनमालांच्या माध्यमातून धर्मगुरूंकडून प्रवचनातून असत्य आणि अमानवी विचारधारेवर माणुसकी व सत्याचा ‘करबला’च्या मैदानात झालेला विजय यावर धर्मगुरू माहिती देतात.
इस्लामी वर्ष हिजरी सन १४३९ची होणार सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:14 AM