---
बेशुद्ध अवस्थेतील तरुणाचा मृत्यू
मालेगाव : तालुक्यातील दहिवाळ येथील राहुल विश्वनाथ शेवाळे (२१) हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला त्याचे वडील विश्वनाथ शेवाळे यांनी सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. फातेमा यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गुजर हे करीत आहेत.
----
रावळगावला घरफोडी
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी दीपक सोमनाथ भदाणे यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भदाणे यांच्या घराचे कडीकोयंडा कापून अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांची रोकड, ५०० रुपये किमतीचा चांदीचा शिक्का, ८०० रुपये किमतीच्या साखळ्या असा २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पुढील तपास हवालदार राऊत करीत आहेत.
----
मालेगावातून दोन दुचाकी लंपास
मालेगाव : शहर परिसरातून दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येथील कैलासनगर भागातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच १५ एएल २८४६ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी जहीरूद्दीन मोहिद्दीन अन्सारी यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी यांनी त्यांचे मित्र संजय साहेबराव गरूड यांना दुचाकी वापरण्यासाठी दिली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एच. देशमुख हे करीत आहेत. तसेच छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्य सीटी स्कॅन सेंटरजवळून २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एपी ७०५१ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी कामेश भगवान सोनवणे या तरुणाने फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
----
फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील सनाउल्लानगर भागातील कारखान्यातून सूत खरेदी करून त्यापोटीचा दिलेला ५० लाखांचा न वटणारा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या प्रो.मे.ए.आर. फेब्रिक्सचे मोहंमद शाहीद रहेमतुल्लाह यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधीर गंगाभिसन कलंत्री यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा वेळोवेळी विश्वास संपादन करून मो. शाहीद यांनी सूतमाल खरेदी करून न वटणारा धनादेश देऊन फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहेत.
----
तरुणाला मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील चंदनपुरी गेट भागात दुचाकीच्या बॅटरीचे पैसे मागितल्याचा राग येऊन अब्दुल हसीब अब्दुल रऊफ याला मारहाण करणाऱ्या औनअली मुस्तफा जाकीर, आमिर मोहंमद नकीब जफर, अली मुस्तफा जाकीर, आसिफ हुसेन ऊर्फ पापा, शाहद हसन व अनोळखी दोन जणांनी लाठीकाठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार आसिफ शेख करीत आहेत.
----