नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील ५०३ धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून प्रशासनाने नोटिसा बजावल्या. पंधरा दिवसांत स्वत:हून बांधकामे न हटविल्यास प्रशासन हटविणार आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह सर्वच धर्मियांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.११) पंचवटीत बैठक होणार असून, यावेळी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.विशेष म्हणजे गेल्या शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एकही धार्मिक स्थळ पाडले जाणार नाही अशी ग्वाही दिली असताना दुसरीकडे मात्र प्रशासन आततायीपणा करून पंधरा दिवसांचा अल्टिमेटम देत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नियंत्रण आहे किंवा नाही, असा प्रश्न केला आहे. महापालिकेने पुरातन आणि त्यानंतर मिळून ५७५ धार्मिक स्थळांना बेकायदेशीर ठरवून ते हटविण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. २००९ पूर्वीची ७२ ही सर्व धार्मिक स्थळे असून, त्यापैकी ७२ धार्मिक स्थळे ही महापालिकेच्या खुल्या जागांवर बांधण्यात आली आहेत.बेकायदेशीरच्या यादीत काळाराम मंदिर?महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात काळराम मंदिर आणि टाळकुटे मंदिर यांसारख्या पुरातन मंदिरांची यादी सादर केल्याचा दावा धार्मिक स्थळ प्रतिनिधींनी केला आहे. मात्र महापालिकेने त्याचा इन्कार केला असून, केवळ मंदिर सर्वेक्षणाची यादी सादर केली आहे. त्यात सर्वच धार्मिक स्थळांचा समावेश आहे. बेकायदेशीर धार्मिक स्थळांची यादी वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांचा वाद पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:41 AM