नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २४ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर शहरातील सर्वच शासकीय आणि खासगी रूग्णालयांतील ऑक्सिजन टाक्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या टाक्यांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी तांत्रिक कर्मचारी उपलब्ध आहेत किंवा कसे, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाचे संकट गेल्यावर्षी उद्भवल्यानंतर खऱ्या अर्थाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचे महत्त्व वाढले आणि त्यामुळे काही मोठ्या खासगी रूग्णालयांनी नव्याने ऑक्सिजन टाक्यांची सोय केली आहे. शहरातील काही मोजक्याच रूग्णालयांमध्ये ही व्यवस्था आहे. त्यानंतर नाशिक महापालिका आणि अन्य शासकीय तसेच निमशासकीय रूग्णालयांमध्येही टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होत असताना टाकीतील साठा संपेपर्यंत नवीन पुरवठा होत असला तरी या टाक्यांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी पुरेशी व्यवस्था आणि कुशल तंत्रज्ञ आहेत का, याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे. महापालिकेने टाकी तयार करून ठेकेदाराकडे हे काम दिले कारण त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, अशावेळी नेमकी दुर्घटना घडल्याने अन्य रूग्णालयांनी काय व्यवस्था केली आहे, याबाबत प्रश्न विचारले जात आहेत.
इन्फो...
मनपा रूग्णालयातील टाकीमधून रूग्णालयातील वेपोरायझरला पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याचे सांगितले जाते. ही पाईपलाईन कॉपरची होती मात्र ती एसएस म्हणजे स्टीलची असणे आवश्यक होते, असादेखील एक मतप्रवाह आहे. त्यामुळे याबाबतचा मुद्दाही चर्चिला जात असून, शासनाच्या निकषांचे पालन होते किंवा नाही, याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.