नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराच्या आवाराऐवजी सिन्नरफाटा बाजूकडील प्लॅटफॉर्म ४ जवळ प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांना जागा देण्यात येईल व तशीच निविदा काढण्यात येईल, असे भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वेस्थानकावर जागेसंदर्भात रिक्षाचालकांचा निर्माण झालेला वाद मिटला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराच्या आवारात रिक्षा रॅक असून, त्यामध्ये सलग चार रांगेने रिक्षा लागतात. मात्र काही महिन्यांपूर्वी त्या रिक्षा रॅकच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे रिक्षाचालकांची गैरसोय होत होती. गेल्या शुक्रवारी रात्री रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात रिक्षा रॅकमध्ये लोखंडी बॅरिकेड्स जोडण्याचे व पहिला रॅक दोन्ही बाजूने लोखंडी पाइप उभे करून बंद करण्याच्या कामाला सुरुवात केली होती. प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाºया ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या वाहनांकरिता रेल्वे प्रशासन रिक्षा रॅकची निम्मी जागा देण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत रिक्षाचालकांनी तीव्र विरोध करत चार दिवस रिक्षा बंद ठेवून विरोध केला. रिक्षा बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेस्थानकावर स्थानिक रेल्वे अधिकारी, पोलीस अधिकारी व रिक्षाचालकांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. तसेच गोडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून रिक्षाचालक ४०-५० वर्षांपासून व्यवसाय करीत असून, त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे सांगितले. तसेच सिन्नर फाट्याकडील प्लॅटफॉर्म ४ च्या बाजूला जागा उपलब्ध असून, त्या ठिकाणी प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांच्या वाहनांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली. गोडसे यांची यादव व मिश्रा यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार गुरुवारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. भुसावळ येथे गुरुवारी भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, रिक्षा चालक-मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे, रमेश दाभाडे, अनिल शिंदे यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत फोकणे, चिडे, खडताळे यांनी रिक्षाचालक व्यवसाय करीत असून, त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तसेच नेहमी व कुंभमेळ्यात रेल्वे प्रशासनाला रिक्षाचालक सर्वतोपरी मदत करतात, असे स्पष्ट करण्यात आले. कुंभमेळ्यात नवीन बनविलेला चौथा प्लॅटफॉर्म व त्याच्या बाजूची मोकळी जागा पडीक आहे. चौथ्या प्लॅटफॉर्मवर येणाºया-जाणाºया काही रेल्वे थांबविल्यास नवीन चौथा प्लॅटफॉर्म बनविण्याचा व सिन्नर फाटा बाजूच्या जागेचा वापर होईल. मुख्य प्रवेशद्वारावरील भारदेखील त्यामुळे थोडा हलका होईल असे स्पष्ट करण्यात आले. चर्चेअंती भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाºया कंपन्यांच्या वाहनांसाठी सिन्नरफाटा प्लॅटफॉर्म ४ येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा काढण्यात येईल, असे स्पष्ट केले. मुख्य प्रवेशद्वाराजवळील रिक्षा रॅकमध्ये खासगी कंपन्यांच्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्याचा विषय निकाली निघाला आहे.बॅरिकेड्स जुळविले जाणारचरिक्षा रॅकमध्ये टप्प्याटप्प्याने लावलेले लोखंडी बॅरिकेड्स एकमेकांना जुळविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे एका रांगेने रिक्षा मार्गस्थ होतील. तसेच रिक्षाचालकांनी ‘प्रीपेड’ पद्धतीनेच त्या ठिकाणी व्यवसाय करावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नियमानुसारच भाडे आकारणी करण्याची वेळ रिक्षाचालकांवर आली आहे.