नाशिक : चोरी, घरफोडी, जबरी लूट, दरोडा यांसारख्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी लांबविलेले दागिने, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम पुन्हा परत पदरात पडेल, याची शाश्वती कोणालाच नसते. कारण चोरी झालेली वस्तू पुन्हा मिळतच नाही, असाच सर्वसामान्यांचा ग्रह आहे; मात्र ‘खाकी’चे कर्तव्य बजावत शहर पोलीस दलाने वर्षभरात विविध गुन्ह्यांमधील जप्त केलेला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केला. मंगळवारी (दि. १२) पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याहस्ते फिर्यादींनी त्यांच्या चोरीस गेलेल्या वस्तू प्रदान करण्यात आल्या.
सोन्या-चांदीचे दागिने, मोटारसायकली, मोबाईल फोन, रोख रक्कम व इतर मुद्देमाल अशा तीन कोटी ५० लाख ९० हजार ६५० रुपयांच्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्तालयाच्या तळमजल्यावर समारंभपूर्वक वाटप करण्यात आले. सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या मुद्देमालाचा यामध्ये समावेश आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आतापर्यंत गेल्या चार वर्षांत मूळ फिर्यादींना सहावेळा समारंभपूर्वक एकूण सुमारे चार कोटी २८ लाख ४६ हजार ९१३ रुपयांचा मुद्देमाल वाटप केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी दीपक पाण्डेय म्हणाले, गुन्हेगारांचा माग काढणे व त्यांच्याकडून त्यांनी लुटलेला ऐवज जप्त करत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून मूळ फिर्यादींना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत करणे, हेच तर पोलीस दलाचे कर्तव्य आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांमुळे निश्चितच जनता व पोलिसांमधील नाते अधिकाधिक वृध्दिंगत होण्यास मदत होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दसऱ्यापूर्वीच मौल्यवान वस्तू पुन्हा पदरात पडल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
--इन्फो--
पोलीस दलाला नागरिकांचा ‘सॅल्यूट’
चोरट्यांनी लांबविलेल्या वस्तू पुन्हा पदरात पडल्याने शहर पोलीस दलाचे उपस्थित फिर्यादींपैकी अर्चना धात्रक, कल्पना क्षीरसागर, संदीप जगताप, ईश्वर गुप्ता, वामन निकम, विशाल शर्मा, समीना शेख, किशोर जोशी, बबन बोराडे, प्रकाश भारती आदींनी मनोगतातून आभार मानले.
--इन्फो--
४० लाखांच्या दुचाकींचे वाटप
दागिने - २९ लाख ७६ हजार
दुचाकी - ४० लाख ५० हजार
मोबाईल - ३ लाख २ हजार
रोकड व अन्य वस्तू - २ कोटी ७५ लाख ८२ हजार ५५० रुपये