जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पूर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप, जऊळके ते देशमाने या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून, या रस्त्यावर प्रवास करणे कठीण झाले आहे.या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. रस्त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, तसेच जळगाव नेऊर ते जऊळके हा लासलगावला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून शेकडो वाहनधारक प्रवास करतात, परंतु रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहनधारकांना विंचूरमार्गे प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे पाठीचे व मणक्याचे आजार जडत असून, अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.चारीचा आधार, पण अपघाताला निमंत्रण...जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्याच्या कडेला दीड किलोमीटर २९ नंबर चारी आहे, खराब रस्त्यामुळे या चारीवरून प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने चारीचा आधार मिळत असला तरी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. येवल्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील डांबरीकरण झालेल्या बरेचशा रस्त्यांचे डांबर निघाल्याने खड्डेमय रस्ते झाले असून रस्त्याने प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रकारची रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक अपघातदेखील झालेले आहेत, जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्यावरून शेकडो नागरिक कामानिमित्त प्रवास करत असतात. त्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.- आनंदा गुंड, जळगाव नेऊर
जळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे झाले अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 6:58 PM