जुने नाशिक : आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे. इस्लाम व प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी देशप्रेमाची शिकवण संपूर्ण समाजाला दिली आहे. त्यामुळे भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण आपल्या न्याय-हक्क व अधिकारांची मागणी केली पाहिजे, असा उपदेश ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना मुफ्ती निजामुद्दीन रजवी यांनी केला.सुन्नी दावत-ए-इस्लामी या आंतरराष्ट्रीय धार्मिक संघटनेच्या वतीने शहरातील इदगाह मैदानावर आयोजित दोन दिवसीय धार्मिक मेळाव्याच्या (सुन्नी इज्तेमा)चा आज समारोप झाला. संध्याकाळच्या सत्रात रजवी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, इस्लाम धर्मात वचनाचे पालन करणे व दिलेल्या वचनाबाबत प्रामाणिक राहण्याला मोठे महत्त्व आहे. आपण आपल्या भारताचा कायदा व त्याच्या अस्मितेविषयीदेखील प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. पाश्चात्य संस्कृतीचा मोहजाळात इस्लामी संस्कृती व शिकवणीचा विसर समाजाला पडत चालला आहे. त्यामुळे समाजाची प्रतिमादेखील मलीन होत चालली असून, याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण तसेच पैगंबरांची शिकवण, याचा अभ्यास करत येणारी पिढी संस्कारक्षम कशी होईल, या दृष्टीने प्रयत्नशील रहावे, असे रजवी यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, मौलाना अब्दुल जब्बार, मौलाना महेबुब आलम, मौलाना आसीफ सय्यद, मौलाना कारी रिजवान खान यांच्यासह आदि धर्मगुरू व उलेमा उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शाकीर अली नुरी यांनी अंतिम सत्रात इस्लामची शिकवण व मुहम्मद पैगंबर यांचा सामाजिक दृष्टिकोन याविषयावर प्रकाश टाकला. रात्री साडेनऊ वाजता जगात शांतता टिकून रहावी व भारताची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी सामूहिक ‘दुआ’ झाली.
भारतीय कायद्याचे पालन हे कर्तव्यच
By admin | Published: January 26, 2015 12:42 AM