नाशिक : गंगापूर धरणात साठा वाढल्याने पुन्हा एकदा चर खोदण्याचा विषय मागे पडला आहे. निविदाप्रक्रिया राबविणे आणि धरणात स्फोटाचा विषय महासभेच्या गळ्यात मारून प्रशासनाने कालहरण केल्याने खडक खोदणे लांबणीवर पडले आहे. त्यामुळे पुढील वर्षी साठा कमी झाल्यास पाण्याच्या निम्न पातळीचा प्रश्न उपस्थित होऊन पुन्हा एकदा जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.महापालिकेच्या वतीने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविण्यात आली असून, त्यामुळे धरणातून जलविहिरीतून पाण्याचा उपसा केला जातो. मात्र वीस वर्षांपूर्वी योजना साकारली जात असतानाच महापालिकेने त्याठिकाणी धरणातील निम्न पातळीवरील पाणी घेण्यासाठी चर खोदण्याचे काम अंतर्भूत केले होते, मात्र त्यानंतर अद्यापही हे काम झालेले नाही. वेळोवेळी धरणात पातळी कमी झाल्यानंतर त्यातील चर खोदण्याचे काम करण्याची संधी असतानादेखील तसे केले जात नाही.आता धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने हे काम करण्यासाठी महापालिकेने तयारी केली होती. धरणात पुरेसा साठा आहे, त्यामुळे चर खोदून पाणी जलविहिरीत घ्यावे, परंतु पाण्याची कपात करू नये असे पत्रदेखील आमदार देवयानी फरांदे यांनी दिले होते. मात्र त्यानंतरदेखील प्रशासनाने कपात तर केलीच, परंतु चर खोदण्याचे विशेषत: खडक खोदण्याचे कामही महापालिका करू शकली नाही.महापालिकेने या कामासाठी निविदा मागवल्या होत्या. त्याचवेळी धरणातील खडक स्फोट करून काढण्याचे अथवा खोदून काढण्याचे दोन पर्याय होते. परंतु तिवरे धरणाची दुर्घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाने धरणात स्फोट करून तो खडक फोडण्याचा प्रस्ताव महासभेकडे टोलावला. दरम्यान, गेल्या शनिवारपासून शहरात संततधार सुरू झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथेही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात जवळपास ४० टक्के पाणी झाले असून, आता धरणात चर खोदणे किंवा खडक फोडण्याचे काम होणे जवळपास अशक्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
गंगापूर धरणातील खडक फोडणे आता अशक्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:19 AM