नाशिक - शहरातील बीएपीएस स्वामिनारायण मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठा महोत्सवांतर्गत मंगळवारी नाशिक शहरातून भव्य नगर शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा करून सहभाग घेतला. या मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येण्याचे भाग्य मला लाभले होते, त्यानंतर आज या मुर्तीप्रतिष्ठाविधी समारंभ देखील माझ्या हस्ते पार पडला याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच, स्वामीनारायण यांची कृपी म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असेही ते म्हणाले.
शहरातील तपोवन साकारण्यात आलेले स्वामीनारायण मंदिर (Swami Narayan Mandir) हे मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्काराचे जतन आणि नाशिक शहराची शोभा वाढवणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंदिराच्या प्रतिष्ठापने निमित्त बोलताना केले. तसेच, 'मुख्यमंत्री झालो आहे, ही सर्व स्वामीनारायणांचीच कृपा' असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. स्वामीनारायण मंदीर नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. तीर्थयात्री, पर्यटक यांच्यासाठी अभिनव व आध्यात्मिक आकर्षणाचे ते केंद्र झाले आहे. १९४३ साली ब्रह्मस्वरूप प्रमुख स्वामी महाराजांनी गोदातिरी भव्य मंदीर उभारणीचा संकल्प केला होता. तो संकल्प सत्यात प्रकटल्याची भावना एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलून दाखवली.
नाशिक नगरी दुमदुमली
दरम्यान, नगर शोभायात्रेची सुरवात गोल्फ क्लब मैदानावरून पूज्य साधू श्रृतीप्रकाश दास यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ संतांच्या हस्ते स्वामीनारायणाची आरती व श्री अक्षर पुरषोत्तम महाराज यांच्या नामस्मरणानंतर करण्यात आली. शोभायात्रेत भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडविणाऱ्या चलचित्ररथांसह जेष्ठ साधू संत, मंहत व हरिभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. यावेळी काही कलावंतानी मानवी मनोरे तयार करून भारतीय लोककलेचे दर्शन घडवले. भव्यनगर शोभायात्रेत सहभागी हरीभक्तांनी केलेल्या स्वामीनारायणाच्या जयघोषाने नाशिक नगरी दुमदुमली होती.