मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यापुढे यश मिळणार नाही. प्रियंका गांधी यांची जादू उत्तर प्रदेशात चालली नाही. त्यामुळे काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. पण, या पक्षात सक्रिय असा नेताच उरलेला नसल्याने हा पक्षच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला यापुढे भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनमाड येथे धावत्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी आठवले यांचे रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, गंगाधर त्रिभुवन, दिनकर धिवर, सचिन दराडे, रूपेश आहिरे, नीलेश इंगळे यांनी स्वागत केले. रिपब्लिकन पार्टीचे व आंबेडकरी चळवळीचे मनमाड शहर व परिसरात अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढील निवडणुकांतही ते टिकवून ठेवावे तसेच कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही आठवले यांनी केले. शिवसेना-भाजपाने यापुढे तरी एकत्र यायला हवे. सत्तावाटपाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरवायला हवे. संजय राऊत किंवा शिवसेनेचे इतर खासदार मला भेटले की मी त्यांना याबाबतीत कायम सूचना व विचारविनिमय करीत असतो, असेही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.