नाशिक : संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठरावीक लोकांपुरती मर्यादित न राहता, प्रचार-प्रसारासाठी सर्वांगीण प्रयत्न केले, तर संस्कृत भाषेलाही नवसंंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला. संस्कृत भाषा सभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात रमेश देशमुख आणि सरिता देशमुख यांना संस्कृत भाषा संवर्धनासाठीचा या वर्षीचा पहिला कै.डॉ.वि.म. गोगटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात यावेळी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, डॉ.विकास गोगटे, विवेक गोगटे, रमेश देशमुख, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, देवदत्त जोशी, सरिता देशमुख, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा सोनवणे, तेजश्री वेदविख्यात, मीनल पत्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात संस्कृतला महत्त्वपूर्ण स्थान दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. पुन्हा जुन्या संस्कृतीकडे वळण्यासाठी नवे राष्ट्रीय धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अधिकार या राष्ट्रीय धोरणाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृतसारख्या पुरातन भाषेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. तसे पाहिले, तर संस्कृत ही अनेक भारतीय भाषांपैकी विदेशातील अनेक भाषांची जननी आहे. संस्कृत आणि पर्शियन भाषेचे व्याकरण पाणिनी यांनी रचलेले आहे. याप्रमाणेच भारतासह इंडोनेशिया, मलेशिया, जपान, व्हिएतनाम येथेही भारतीय संस्कृतीची पाळेमुळे दिसतात, ती संस्कृत भाषेमुळेच, असेही त्यांनी नमूद केले. संस्कृतमुळेच भारतीयांची आचरणाची संस्कृती उच्च राहिली आहे. असे असले ,तरी सध्या संस्कृत ही ठरावीक गटाची भाषा असा असलेला आक्षेप आणि संस्कृत भाषेविषयी असलेली विमुखता दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन डॉ.अभिजीत सराफ, मीनल पत्की, अमित नागरे यांनी केले.