पर्यटनस्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये पर्यटक म्हणून अतिरेकी किंवा असामाजिक तत्त्व असणारे लोक देखील वास्तव्यास येऊ शकतात. तसेच अशा लोकांकडून सार्वजनिक शांतता भंग, मानवी जीवितास धोका, आरोग्य असुरक्षितता व वित्तहानी, बॉम्बस्फोट, गोळीबार, दंगली, मारामाऱ्या यांसारखे प्रकार होण्याची शक्यता असल्याने ते टाळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती असणे, या कायद्यान्वये बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी बंगले, फार्म हाऊसचे मालक, कॅम्पचे आयोजन करणारे जागामालक यांनी पर्यटक किंवा अतिथी यांना बंगला किंवा जागा भाडेतत्त्वावर देताना त्यांची माहिती नोंदविणे सक्तीचे आहे. यात पर्यटक अथवा अतिथी यांची एकूण संख्या, सर्वांची नावे, पत्ते, ओळखपत्रे, सर्वांचे मोबाइल क्रमांक, ज्या वाहनातून आले त्या वाहनाचा क्रमांक, पर्यटक किंवा अतिथी हे कोठून आले, आल्याचा दिनांक व जाण्याचा दिनांक व स्वाक्षरी आदी बाबींची नोंद घेण्यात यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पर्यटक व अतिथी यांचे आधारकार्ड किंवा कोणत्याही स्वरूपाचे ओळखपत्र घेऊन त्याचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे. हे रेकॉर्ड तसेच बंगले व फार्म हाऊस यांच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्हींची संख्या व त्यांचे रेकॉर्डिंग सुरू असल्याची माहिती देणे हे खासगी बंगले, फार्म हाऊस यांचे मालक यांना बंधनकारक करण्यात आले आहे. बंगले, फार्म हाऊस या ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे असून, सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग डीव्हीआर किंवा एनव्हीआर हे ३० दिवसांपर्यंत राहील असे ठेवण्यात यावे, असेही पोलीस प्रमुखांच्या आदेशात म्हटले आहे.