लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : चालू हंगामात खत उत्पादक कंपन्यांनी खतांची दरवाढ केली आहे. परंतु, तालुक्यातील खत विक्रेत्यांना जुना खतसाठा जुन्याच दराने विक्री करणे बंधनकारक असेल. ज्यादा दराने खत विक्री केल्यास खत नियंत्रण कायद्यानुसार विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी तथा तालुका गुणनियंत्रण निरीक्षक विजय पाटील यांनी दिला.
दरम्यान, खत विक्रीचा कळवण तालुक्यात काळाबाजार होऊ नये, या पार्श्वभूमीवर तालुक्यात भरारी पथक तैनात करण्यात आले असून, हे पथक खत विक्रेत्यांच्या खत विक्री, बियाणे कारभारावर नजर ठेवून असणार आहे. त्यामुळे खत विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. केंद्र शासनाच्या एनबीएस (न्युट्रीएंट बेस्ड सबसिडी) धोरणानुसार युरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार त्या-त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीला आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांच्या किमतीत वाढ केली आहे.
कळवण तालुक्यातील बऱ्याच खत विक्रेत्यांकडे जुना व नवीन खतसाठा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांची चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी खत विक्रेत्यांनी दुकानांबाहेर दर्शनी भागात शिल्लक खत साठा व दरफलक लावणे बंधनकारक राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खत विक्रेत्यांनी नवीन दराने खत विक्री केल्यास विक्री पावतीवर जुना खत साठा शिल्लक नसल्याने लिहून देणे बंधनकारक असेल. जुना खतसाठा शिल्लक असताना कोणीही नवीन अथवा चढ्या दराने खत विक्री करू नये. असे आढळून आल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास खत विक्रेत्यांवर खत नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर खते या योजनेंतर्गत शेतकरी बचत गटांना रासायनिक खत देसराणे, इन्शी व विसापूर या गावांत कंपनी दरात वितरकामार्फत पोहोच झालेले आहे तसेच तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे बचतगट असतील, त्यांनीही या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
गोणीवरील खतांचे दर तपासून घ्यावेत
कळवण तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांवर तालुका गुणनियंत्रण भरारी पथकाव्दारे नजर ठेवणार असून, भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी ई-पाॅस मशीनच्या पावतीवरील खतांचे दर व खताच्या गोणीवरील खतांचे दर तपासून घ्यावेत. यामध्ये जर तफावत आढळली तर कृषी विभागाशी संपर्क साधावा तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर गर्दी न करता, गटांमार्फत खते, बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.