नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि प्रतिबंधात्मक निर्बंधांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी असलेले उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. १६) पुन्हा दस्तनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दस्तनोंद करण्यासाठी नागरिकांनी कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा ऑनलाईन पद्धतीने वेळ निश्चित करून येणे अनिवार्य करण्यात आले आहे.
राज्य सरकारने महिलांच्या नावावर घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत घेण्यासाठी त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची दस्तनोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुद्रांक शुल्क कार्यालयात वर्दळ असताना राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवार (दि. १४) रात्री ८ वाजेपासून संचार बंदीसोबतच कडक निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे गुरुवारी दस्त नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार किंवा नाही, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम असतानाच मुद्रांक शुल्क विभागाने शहरासह जिल्ह्यातील कार्यालये बंद ठेवली होती. परंतु, शुक्रवारपासून सर्व कार्यालयांमध्ये दस्तनोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात दूरध्वनीद्वारे वेळ निश्चित करून अथवा ऑनलाईनद्वारे दस्तनोंदणी कालावधी नोंदवून त्याच वेळेत दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या प्रक्रियेत एका दस्त नोंदीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार असल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागातील सूत्रांनी दिली आहे.
कोट-
संचारबंदी आणि कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांना अनुसरून दस्तनोंदणी कामाकाजाविषयी मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी एक दिवसासाठी प्रकिया बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारपासून कामकाज सुरू झाले आहे. मात्र नागरिकांनी दूरध्वनी अथवा ऑनलाईन नोंदणीद्वारे वेळ निश्चित करून दस्तनोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयांमध्ये यावे.
- कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक