नाशिक : इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी का लादण्यात आली, हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे की यामागे अन्य कुठली कारणे आहेत, याबाबत योग्य मीमांसा करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी गुरुवारी (दि. १४) ‘इंदिरा पर्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे आयोजित ग्रंथालय सप्ताहांतर्गत आयोजित व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी, आणीबाणी लादण्यावरून आपल्या देशात अनेक मत-मतांतरे असली तरीही ही आणीबाणी आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती तसेच देशांतर्गत स्थिती, युद्धाचा बोजा, दुष्काळ आदी कारणांमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केली असल्याचे सांगितले. इंदिरा गांधी यांनी स्वीकारलेल्या धोरणाच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाºया परिस्थितीचे पदर, भौगोलिक परिस्थिती अवलंबून असल्याचे सांगितले. आणीबाणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला असला तरीही विरोधकांनी आणीबाणी तसेच विविध मुद्द्यांचा गैरवापर करून केलेला प्रचारामुळे झाला असल्याचे केतकर यांनी यावेळी सांगितले. वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या व्याख्यानादरम्यान व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष अॅड. अभिजीत बगदे, वसंत खैरनार, शंकरराव बर्वे, बी. जी. वाघ उपस्थित होते. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या व्याख्यानात बोलताना कुमार केतकर यांनी अमेरिका, रशिया, चीन आणि भारत यांचे आपापसातील संबंध त्याकाळी कसे होते, व्हिएतनाम युद्ध, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती, बांगलादेशातील नागरिकांचे भारताकडे येण्याचे प्रमाण यांसह विविध राजकीय घटनांचा यावेळी उल्लेख केला.
आणीबाणीच्या कारणांची योग्य मीमांसा होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:32 AM