लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्त्री ही निसर्गाची किमया असून, विश्वाची पुनर्निर्मिती करण्याची शक्ती तिच्यात सामावली आहे. मासिक पाळी या पुनर्निर्मितीचा महत्त्वपूर्ण टप्पा तर आहेच, पण स्त्रीत्व आणि मातृत्व या दोहोंचा समन्वय साधणाऱ्या या नैसर्गिक वास्तवाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही मासिक पाळीविषयीचे समाजात अज्ञान आणि गैरसमज असणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील आरोग्य, शिक्षण व महिला व बालविकास विभागामधील प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील तीन प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. व्यासपीठावर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी इशाधीन शेळकंदे उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानाच्या पुढच्या टप्प्यात मासिक पाळी व्यवस्थापन या विषयानावर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येणार असून विषयाबाबत ग्रामस्तरापर्यंत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले. विविध शाळा व विद्यालयांमधूनही या विषयाबाबत माहिती देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले असल्याचे त्यानी सांगितले.जिल्हास्तरीय प्रशिक्षणानंतर तालुकास्तरावरून शिक्षिका तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण घेणार असून, प्रवीण प्रशिक्षक तालुकास्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष शाळांमध्ये मुलींना प्रशिक्षण देतील. त्यात प्रामुख्याने किशोरवयीन वयात मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल, मासिक पाळीतील समस्या, मासिक पाळीबाबतच्या अंधश्रद्धा व गैरसमजुती, मासिक पाळीत वापरायची साधणे, मासिक पाळीत घ्यावयाचा आहार आदींबाबत भाग्यश्री बैरागी, माधवी गांगुर्डे, विणा कुलकर्णी, ज्याती देशमुख, भारती कळंबे यांनी मार्गदर्शन केले.(फोटो ३१ झेडपी)