नाशिक : साधू-महंत व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक होत असून, या बैठकीत पारंपरिक शाही मिरवणूक मार्गाऐवजी पर्यायी शाहीमार्गाला अनुमती मिळण्याची त्याचबरोबर तपोवनातील शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याच्या मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी व स्थानिक आखाड्यांच्या साधू-महंतांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. महाजन यांची ती पहिलीच बैठक असल्याने कुंभमेळ्याचा आराखडा व त्या अनुषंगाने केली जाणारी कामे याचाच आढावा घेण्यात येऊन गोदावरीचे सांडपाणी, साधुग्राममधील जमिनींचे अधिग्रहण व शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत चर्चा होऊन या साऱ्या प्रश्नांबाबत सविस्तर बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठक आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने तपोवनातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाबाबत नोटिसा बजावून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली, तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला. प्रशासनाला जागा देण्यास यापूर्वी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता जमीन अधिग्रहण करून देण्याची तयारी दर्शविली; परंतु त्यांना वाढीव मोबदल्याची अपेक्षा आहे. प्रतिएकरी ३४ लाख रुपये मिळावेत असा प्रस्ताव त्यांनी प्रशासनाला सादर केला आहे. शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळावा अशी प्रशासनाचीही भावना आहे; परंतु त्याला मर्यादा आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास महाराज यांनी पारंपरिक शाहीमार्ग व पर्यायी मार्गाची पाहणी करून मिरवणूक मार्गावर येणाऱ्या विस्तारीकरणाच्या अडचणींची माहिती घेतली व पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या बैठकीत या मुद्द्यावर ऊहापोह होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पर्यायी शाहीमार्गाचा तिढा सुटणे शक्य
By admin | Published: January 08, 2015 12:39 AM