नाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टँकरला मुदतवाढ देण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील टँकर चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे बंद झाले आहेत. मे-जून महिन्यात जिल्ह्यात टँकर सुरू होते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे जुलैमध्ये देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. मात्र, अवघ्या चार दिवसांच्या पावसाने जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.
यंदा जिल्हा मार्च महिन्यातच तहानला आणि टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मे-जून या कालावधीतही टँकर कायम होते. विहिरींनी तळ गाठला, तर पाण्याचे स्त्रोतही आटल्यामुळे मार्च महिन्यापासून टँकरची मागणी सुरू झाली आणि गतवर्षीच्या तुलनेत मे महिन्यातच टँकरची संख्या दुपटीने वाढली होती. सर्वांधिक टँकर नेहमीप्रमाणे येवला तालुक्यात सुरू करण्यात आले होते. पेठ, सुरगाणा तालुक्यातही टँकरची संख्या वाढलेली होती.
जिल्ह्यातील सिन्नर, बागलाण, पेठ, सुरगाणा या ठिकाणी टँकरच्या फेऱ्या वाढतच असल्याने तब्बल २३६ गाव व वाड्यांची ८४ टँकरने तहान भागविली जात होती. राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झालेला असतांना जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, पाऊस लांबल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली असतांनाच गेल्या शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आणि नद्यांना पूर आल्याने अवघ्या पाच दिवसांच्या पावसानंतर जिल्ह्यातील टँकर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.