राणा दाम्पत्याच्या अट्टाहासापोटीच व्हायला नको ते झाले : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 01:51 AM2022-04-25T01:51:10+5:302022-04-25T01:51:37+5:30
‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी अट्टाहास कायम ठेवल्याने खारला राणा दाम्पत्याच्या फ्लॅटभोवती शिवसैनिक जमले. अट्टाहासापोटी व्हायला नको ते झाले असून, आता पोलीस आणि न्याययंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिक : ‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी अट्टाहास कायम ठेवल्याने खारला राणा दाम्पत्याच्या फ्लॅटभोवती शिवसैनिक जमले. अट्टाहासापोटी व्हायला नको ते झाले असून, आता पोलीस आणि न्याययंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार यांनी अमरावतीचे आमदार खासदार यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला असला तरी त्यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, हेदेखील पाहणे आवश्यक असते. प्रत्येकाची श्रद्धा असली तरी त्यासाठी मंदिर आहेत, अन्यथा आपल्या घरात म्हणण्यात कोणाचीच हरकत नाही. मात्र, एका पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करायची म्हटल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यातून शिवसैनिक तिथे जमले. कोणतेही काम कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून करावे, असेही त्यांनी नमूद केले. मातोश्रीबाबत शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. तीच भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची ज्येष्ठ नेत्यांबाबत असते. कंबोज प्रकरणातही कुणी म्हणतं अंगावर गाडी घातली, कुणी म्हणतं दगड फेकले. पोलीस या प्रकरणातही व्यवस्थित काम करतील. कुणाची चूक, कुणाची जबाबदारी या सर्व बाबी सीसीटीव्हीत तपासल्या जातील. कोणत्याही पक्षाला राज्यकारभार करत असताना सगळीकडे शांतता नांदायला हवी असते. मात्र, विरोधकांना वाटतं की, पोलीस फक्त सत्ताधाऱ्याचं ऐकतात, असा समज आहे. आम्ही विरोधात हवं तेव्हाही असं वाटायचं. केंद्र असो वा राज्य सुरक्षा, कोणावरही हल्ला नकोच. कुणालाही उचकविण्याचा प्रयत्न व्हायलाच नको. प्रत्येकाने तारतम्य बाळगावे, तसेच कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाला पोलिसांनी बळी पडू नये, असेही पवार यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री छगन भुजबळ आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.