नाशिक: मागीलवर्षी कोरोनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये इतके करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता शासनाच्या पुढील आदेशापर्यंत थाळी पाच रुपयांनाच मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना संकटाच्या काळात मागीलवर्षी गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांना पाच रुपयांत मिळणाऱ्या शिवभोजन थाळीचा आधार लाभला होता. यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने निर्बंध अधिक कठोर करण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळी अनेकाना आधार ठरू शकणार आहे. राज्यात निर्बंध अधिक कठेार होणार असल्याची चिन्हे असल्याने अल्पदरात मिळणारी शिवभोजन थाळी
पुढील काळातही अनेकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. अवघ्या दहा रुपयात सर्वसामान्य नागरिकांना पेाळी, भाजी, वरण, भात दिला जातो. या थाळीचा लाभ मोलमजुरी करणारे मजूर, गावखेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी येणारे सर्वसामान्य नागरिक यांना या शिवभोजन थाळीचा चांगलाच लाभ होत आहे. राज्यात कोरेानाचा प्रभाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार आदी दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला. कारखाने बंद झाले त्यामुळे हातालाही काम राहिले नाही. अशा काळात शिवभोजन थाळी पाच रुपयांना जाहीर करून शासनाने अनेकांची भूक भागविली. मागीलवर्षी शिवभोजन थाळीचा दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता. १ एप्रिलपासून शिवभोजन थाळीचे दर पूर्ववत म्हणजे दहा रुपये इतके केले जाणार होते. मात्र, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बिघडत असल्याने शासनाने मार्च महिना संपल्यानंतरही थाळीचे दर पाच रुपये इतकेच ठेवले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पाच रुपय किमतीनेच शिवभोजन थाळीची विक्री केली जाणार असून जिल्ह्यातील १७ लाख नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.
--इन्फो--
जिल्ह्यात ४५ शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. शहरात १४ तर ग्रामीण भागात ३१ शिवभोजन केंद्रे आहेत. शहरातील केंद्रांवर ३ हजार ७०० थाळ्या तर उर्वरित ग्रामीण भागातील केंद्रांसाठी ३ हजार ३०० थाळ्या मंजूर करण्यात आहेत. शहर व जिल्ह्यात मिळून ६ हजार ५०० हून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण होत आहे. मागील एक वर्षात १७ लाख ५३ हजारांहून अधिक नागरिकांनी शिवभोजनचा आस्वाद घेतला.