नाशिक : सध्या सर्वत्र विचारांच्या महामारीचे संकट असून या महामारीतून छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसह कर्मवीरांच्या विचारातून घडलेली पिढी राष्ट्राला वाचवू शकेल, त्यासाठी अशा व्यक्तींच्या विचारातून नीतिमूल्य शिक्षणाधिष्ठित विद्यार्थी घडविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास यशोमती ठाकूर यांनी केले. मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थांसारख्या संस्थावर अशी पिढी घडविण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मविप्रच्या सीएमसीएस महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे तसेच कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील मुलींच्या वसतिगृह नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २) पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, हिरामण खोसकर, माजी मंत्री शोभा बच्छाव, संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे आदी उपस्थित होते. जातीभेद आणि अंधश्रद्धेविरोधात कर्मविरांनी विरोधात कर्मवीरांनी शिक्षणाचा प्रसार प्रचार करण्यासाठी मविप्रच्या माध्यमातून एक आंदोलन उभे केले आहे. हे आंदोलन अजूनही सुरूच असून आते हे आंदोलन विचारांच्या महामारीविरोधात लढण्यासाठी शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो-
ठाकूर यांना मविप्रचे सभासदत्व
महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहे. मात्र त्यांचे सासर सटाणा येथील असून त्यांचे पती राकेश सोनवणे हे मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभासद होते. त्यांच्या वारसा हक्काने यशोमती ठाकूर यांना मविप्रचे सभासदत्व देण्यात आले आहे. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सभासदात्व ओळखपत्र प्रदान करून त्यांना संस्थेचे सभासदत्व प्रदान केले. त्यामुळे संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही वेगळी समीकरणे समोर येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.