पंचवटी : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. प्रभाग बैठकीत विषय येत नसतील तर प्रभाग बैठका घेऊ नका, अशा शब्दात प्रशासनाला खडसावून कामे होत नसल्याचे खापर फोडले. प्रभागाची बैठक सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२४) संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी तीन ते पाच लाखांच्या कामांचे विषय विषयपत्रिकेवर घ्यावे. विषय पत्रिकेवर विषय येत नसल्याने सदस्यांच्या अधिकारावर गदा आलेली आहे. मनपाच्या सर्वच शाळांतील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. कुठे दरवाजे तुटले तर कुठे पाणी नाही, स्वच्छता नाही, बांधकाम, विद्युत तसेच संबंधित विभागाने तत्काळ पाहणी दौरा करून दखल घ्यावी तसेच मनपा शाळेत अॅक्वा गार्ड व पाण्याच्या टाक्या बसवाव्यात, अशी सूचना केली.विषयपत्रिकेवर विषय येत नसल्याने बैठक घेणे निरुपयोगी ठरत आहे. दिंडोरीरोडवरील तारवालानगरला गतिरोधक प्रश्न अजूनही प्रलंबित असून मनपाने त्याठिकाणी रंबलर आणि कॅट आय बसविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जगदीश पाटील यांनी केली. फुलेनगरला पथदीप बंद असल्याचे शांता हिरे यांनी सांगितले. तर आडगाव येथील मनपा शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. विषयपत्रिकेवर विषय येत नसतील तर प्रभाग सभा कशासाठी असा सवाल शीतल माळोदे यांनी केला. अमृतधाम येथे शौचालयाची स्वच्छता होत नाही.हिरावाडीतील कालिकानगरला उभारलेल्या रुग्णालयात डॉक्टरही नाही आणि औषधही मिळत नसल्याची तक्रार पूनम मोगरे, रुची कुंभारकर यांनी केली तर प्रभागातील अनेक नागरिकांना घरटपट्टी तसेच पाणीपट्टीची देयके मिळत नसल्याचे प्रियंका माने यांनी सांगितले. मनपा तत्कालीन आयुक्त मुंढे यांची बदली झाली खरी, मात्र त्यानंतर प्रशासनावर वचक राहिलेला नाही शिवाय मुंढे होते त्यावेळी परिस्थिती ठीक होती, आता परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. बैठकीत झालेल्या चर्चेत पुंडलिक खोडे, हेमंत शेट्टी, सुरेश खेताडे, सरिता सोनवणे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, संजय दराडे, राहुल खांदवे, आर. एस. पाटील आदींनी सहभाग घेतला होता.मनपा शाळांमध्ये सुरक्षारक्षक वाढवावेमहापालिकेच्या शाळांत सुरक्षारक्षक नसल्याने शाळांची दुरवस्था झालेली आहे. नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयात अनेक सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. महापालिकेला कोण खाते, तेथील सुरक्षारक्षकांची संख्या कमी करून तेच सुरक्षारक्षक मनपाच्या शाळेत नेमले तर शाळांची सुरक्षितता व देखभाल व्यवस्थित राहील.- अशोक मुर्तडक, माजी महापौर
मुंढे होते तेव्हा बरे होते... आता परिस्थिती बिघडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:45 AM