महापौर सतीश कुलकर्णी आणि नगरसचिव राजू कुटे यांची मध्यंतरी बैठक झाली. त्यानंतर चालू महिन्याची नियमित महासभा १८ फेब्रुवारीस तर स्थायी समितीचे विशेष सदस्य नियुक्तीसाठी येत्या २६ फेब्रुवारीस महासभा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नगरसचिवांकडे याबाबत लिखित स्वरूपात काहीही नसल्याने त्यांनी स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठीची विशेष महासभाच जाहीर केलेली नाही.
महापालिकेत भाजपाचे दोन नगरसेवक कमी झाल्याने या पक्षाचे तौलनिक बळ घसरले आहे. त्याचा लाभ शिवसेनेला होत असून त्याच आधारे भाजपचा एक सदस्य कमी करून सेनेचा एक सदस्य वाढवण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सत्तारूढ भाजपने सुरुवातील खळखळ केली. आता मात्र, महासभा घेण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला नियमित सभा आणि विशेष महासभा एकाच वेळी घेण्याचे ठरले होते, मात्र नंतर १८ फेब्रुवारीस नियमित महासभा आणि २६ फेब्रुवारीस विशेष महासभा घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, एकाच सभेची सूचना जारी करण्यात आली आहे.