नाशिक : कोरोनाचा प्रकोप सुरू असताना संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब बाधित होत आहेत. मात्र, त्याचवेळी अनेक कुटुंबांतील नागरिक एकमेकांना मानसिक आधार देत घरीच उपचार घेऊन बरे होत असल्याची अनेक उदाहरणे समाजात घडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत नाशिकमधील काही कुटुंबांनी घरातच उपचार घेत केलेला कोरोनाचा सामना हा अन्य कुटुंबीयांसाठीदेखील निश्चितच प्रेरणादायी आहे.
तब्बल १४ जणांचे कुटुंब कोरोनामुक्त
अशोकस्तंभ परिसरात निवास असलेल्या अनवडे या एका कुटुंबाने घरातच राहून उपचार घेत कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे दोन ज्येष्ठ नागरिकांसह सहा जणांचे कुटुंब घरीच उपचार घेऊन बरे झाल्यानंतर त्यांच्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील आठ जणदेखील बाधित झाले. त्यांनीदेखील घरीच उपचार घेतल्याने एकाच कुटुंबातील १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकीकडे कोरोना झाल्याचे समजताच नागरिक प्रचंड घाबरून थेट हॉस्पिटलची शोधाशोध करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचवेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन सर्व निर्बंध आणि उपचारांचे काटेकोर पालन केल्यास घरीच उपचार घेणेदेखील शक्य असते, हेच अनवडे यांच्या उदाहरणातून दिसून येते.
कोट
मी बाधित झाल्यानंतर प्रचंड घाबरलो होतो. माझ्याकडे मेडिक्लेम असल्याने ॲडमिट होण्याबाबतही मी चौकशी केली. मात्र अखेरीस त्यापेक्षा घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य ठरून सर्व कुटुंबीय कोरोनामुक्त झालो.
संजय अनवडे
(फोटो १३अनवडे कुटुंब)