लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचे पगार कमी झाले. टाळेबंदी आणि प्रतिबंधात्मक निमयांमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. यातील बहुतेकांचे गृहकर्ज व व्यावसायािक कर्ज व वैयक्तिक कर्जाचे हप्ते थकले आहेत. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू झाला आहे.
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला तीन महिने विविध कर्जांच्या परतफेडीसाठी ग्राहकांना सवलत दिली होती; परंतु पुढील काळात कोरोनाचे संकट पहिल्या लाटेत अधिक गडद झाल्याने ही सवलत सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेदरम्यान टाळेबंदी व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सरकारने अशी कोणतीही सवलत देऊ केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असून हप्ता भरायला उशीर झाल्यामुळे अथवा कर्जाचा हप्ताच भरता येऊ न शकल्याने बँकाच्या वसुली विभागाचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत.
सारीच कर्जे थकली; गृहकर्जाचे प्रमाण जास्त
कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांसह अनेक व्यावसायिकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून घरासाठी, व्यावसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यात वैयक्तिक कर्जधारकांचाही समावेश आहे. मात्र, सर्वाधिक प्रमाण गृहकर्जधारकांचे असून हातचा रोजगार गेल्यामुळे डोक्यावरचे छत वाचविण्यासाठी सर्वसामान्यांना कसरत करावी लागत आहे.
२) काहींना नोटिसा, तर काहींची मालमत्ता जप्त
कर्ज थकल्यामुळे कोरोना काही जणांना बँकांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात खासगी क्षेत्रातील बँका आणि फायनान्स कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. तर जुजबी आर्थिक उत्पन्न असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मालमत्तांच्या जप्तीपासून वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या ग्राहकांकडून तात्पुरती तजवीज करून आपल्या मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नोकरी गेली, गृहकर्ज थकले !
कोरोना संकटात नोकरी गमवावी लागली. त्यामुळे घराचे हप्त थकले आहेत. बँकेकडून गृहकर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा सुरू आहे; परंतु अजूनही नियमित नोकरी सुरू झालेली नाही.
त्यामुळे पगार पूर्ण होत नसल्याने कर्जाचे हप्ते थकले आहेत. शासनाने कर्ज हप्ते भरण्यास काही कालावधीसाठी सवलत देणे आवश्यक आहे.
- विलास कोलते, ग्राहक
---
नोकरीच्या भरवशावर घर घेतले होते; परंतु लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली. आता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे; परंतु व्यवसाय स्थिर स्थावर होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. तोपर्यंत सरकारने कर्जफेड करण्यासाठी सवलत देणे आवश्यक आहे.
संदीप जाधव, ग्राहक
----
दुकान बंद पडले, कर्ज कसे भरणार?
कोरोना काळातील टाळेबंदीत दुकान बंद होते. मात्र, दुकानाचे भाडे, वीज बिल व इतर खर्च सुरू होते, शिवाय उत्पन्नही थांबले होते. त्यामुळे आर्थिक खर्चाचे गणित जुळविण्यासाठी दुकान बंद करावे लागले. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोतच संपुष्टात आल्याने कर्जफेड करण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याचे कोरोना काळात दुकाने बंद कराव्या लागलेल्या व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. कोरोना काळात व्यवसाय डबघाईला आल्यामुळे व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने अशा संकटातील व्यावसायिकांना सावरण्यासाठी सरकारने विशेष योजना राबविण्याची मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट
कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक असे सर्वच घटक कमी अधिक प्रमाणात अडचणींचा सामना करीत असताना विविध बँकांच्या वसुली विभागाचे अधिकारी ग्राहकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहे. कोरोना काळात बँकांच्या कर्जवसुलीचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे वसुली विभागातील कर्मचारी व अधिकऱ्यांच्या अतिरिक्त मानधनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असून बँकांकडून कर्मचारी, अधिकाऱ्यांना कर्जवसुलीचे टार्गेट दिले जात असल्याने वसुली अधिकऱ्यांकडून ग्राहकांकडे वसुलीसाठी सतत तगादा लावला जात आहे.