नाशिक : शहरातील गोविंदनगर भागात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, या रुग्णाशी अत्यंत निकटच्या संपर्कात आलेल्या अत्यंत जोखमीच्या १७ जणांना कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. याशिवाय बाधित रुग्ण राहत असलेली संपूर्ण इमारतच सील करण्यात आली असून, सहाशे मीटर क्षेत्रातील सुमारे चार हजार घरांना चौदा दिवसांसाठी त्या परिसरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर कोअर एरिया वगळता एकूण ३ किलोमीटर क्षेत्रातील १० हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी २९ पथके तयार करण्यात आली आहेत.नाशिकमध्ये सुरुवातीला एकही रुग्ण नव्हता. मात्र त्यानंतर आधी निफाड तालुक्यातील एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला. ग्रामीण भागातील हा रुग्ण असल्याने शहरात रुग्ण आढळत नसल्याने फारसे चिंतेचे कारण नव्हते. मात्र, आता शहरातील गोविंदनगर भागात ४४ वर्षांचा रुग्ण आढळल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने बाधित रुग्णाच्या घराला केंद्रबिंदू मानून त्याच्या तीन किलोमीटर परिसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. तर त्यातील ६०० मीटर कोअर एरिया आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील कोणीही व्यक्ती चौदा दिवस बाहेर पडू शकणार नाही किंवा बाहेरील कोणीही व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाही. या प्रतिबंधित क्षेत्रात हिरव्या रंगाची सीमारेषा आखण्यात आली आहे. सीमारेषेत कोणीही आत-बाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली असून, याठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्ण राहात असलेल्या इमारतीला चौदा दिवसांसाठीच सील करण्यात आले असून, सर्व रहिवाशांना त्यांच्या घरीच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे.महापालिकेने बाधित रुग्णाच्या घरापासून सहाशे मीटर अंतरापर्यंतचे क्षेत्र (कोअर एरिया) प्रतिबंधित घोषित करण्यात आले आहे. यात सुमारे १ हजार ५५० घरे असून चार हजार लोकसंख्या आहे. या सर्वांना बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या ठिकाणी हिरव्या रंगाची सीमारेषा आखण्यात आली असून, बफर्स झोनमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.मंगळवारी (दि. ७) या भागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. महापालिकेने या भागात आरोग्य तपासणी करण्यासाठी २९ पथके नियुक्त केली आहेत. यात ६ पथके खास निगराणीसाठी नियुक्त करण्यात आली आहेत. सील केलेल्या क्षेत्रातील सर्व घरांमध्ये सर्वेक्षण करून प्रसंगी आरोग्य तपासणी केली जात आहे. प्रामुख्याने अलीकडील काळात कुठे प्रवास केला होता की काय याचीदेखील माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने प्रथमच अशाप्रकारचे सुरक्षिततेचे नियोजन करण्यात आले आहे.महापालिकेने आरोग्यविषयक मदतीसाठी हेल्पलाइन क्र मांक जाहीर केला आहे. या क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यविषयक काही त्रास होत असल्यास त्यांनी ०२५३- २३१७२९२ तसेच डॉ. मोरे यांच्याशी ७०३०४६९४६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.