नाशिक : आगामी काळात भारत हे हिंदू राष्ट्र करण्यासाठी जे जे करायला हवे ते करण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण या देशात हिंदू राष्ट्र निर्माण करणे अवघड आहे हे मणिपूरच्या घटनेने दाखवून दिले आहे. या देशात अपल्पसंख्याकांचे अनेक प्रश्न आहेत. याशिवाय हिंदूंमधीलच काही जातींचा हिंदू राष्ट्राला विरोध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
विचार जागर फाउंडेशनच्या वतीने येथील मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित मणिपूरच्या धगीचा अर्थ काय या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सुरेश भटेवरा, निरंजन टकले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कसबे म्हणाले, मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. यामुळे निर्माण झालेला प्रश्न आपल्याला काय धडा देणर आहे हे महत्त्वाचे आहे.
या घटनेमागे अनेक कंगोरे आहेत. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी जे जे करावे लागणार आहे, ते तेथे केले जात असून, येणाऱ्या निवडणुकीत देशातील जनतेने सत्ता बदल करायला हवा, असे त्यांनी सांगितले. उत्तम कांबळे म्हणाले, आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. कोणत्याही जातीचे अथवा धर्माचे नाहीत. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी धग वाढत जाईल. केवळ राखीव जागा हे मणिपूर हिंसाचाराचे एक कारण दिसत असले तरी अन्य भूमिकाही त्यामागे आहेत. जेव्हा व्यवस्थेकडून सामान्य माणसांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, तेव्हा राखीव जागांचे गाजर पुढे केले जात असल्याचेही ते म्हणाले.
निरंजन टकले आणि सुरेश भटेवरा यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा भूप्रदेश, तेथील विविध जाती आणि त्यांचे प्रश्न याविषयीचे विवेचन केले. यावेळी मणिपूरमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव कथन करतानाच तेथील हिंसाचाराची धग उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.