एकलहरे : येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.येथील एकलहरे वीज केंद्रापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंत महानिर्मिती कंपनीने पथदीपांची व्यवस्था केलेली आहे. किर्लोस्कर टेकडीपासून पुढे सिन्नर फाट्यापर्यंत महानगरपालिकेने पथदीप बसविले आहेत. मात्र हे पथदीप गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने किर्लोस्कर टेकडी ते गवळीबाबा मंदिरापर्यंत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याच रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीचा कारखाना आहे. तेथे चौकीदार रात्रं-दिवस पहारा देत असल्याने कंपनीच्या आतल्या भागात दिवे आहेत. मात्र मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अंधार असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रेल्वे ट्रॅक्शनच्या पुढे गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतचा हा रस्ता आधीच निर्जन आहे.अंधाराचा गैरफायदा घेऊन या रस्त्यावर अनेक गैरप्रकार व लुटमारीचे प्रसंगही घडले आहेत.सायंकाळनंतर या रस्त्यावर प्रेमीयुगुलांचा वावर वाढतो. अनेकदा गैरप्रकारही नागरिकांनी पाहिले आहेत. अंधाराचा फायदा घेत अनेकदा या रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे आणून टाकली जातात. रस्त्याच्या कडेला धनदाट झाडी असल्याने सापांचे प्रमाणही वाढले आहे. रात्री-बेरात्री वाहनधारकांना सापांचे दर्शन झाले आहे. गेल्याच आठवड्यात किर्लोस्कर कंपनीच्या चौकीदाराला बिबट्याचे रात्री साडेआठच्या सुमारास दर्शन झाले. त्याचवेळी एकलहरेकडे जाणाऱ्या रिक्षावाल्यालाही बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला. त्यामुळे रिक्षा पुढे नेण्यास त्याने हिंमत केली नाही. बिबट्या किर्लोस्कर टेकडीच्या जंगलात दिसेनासा झाल्यावर रिक्षा पुढे नेली.वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणीया रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत अनेकदा छोट्या-मोठ्या रस्ता लुटीच्या व चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी जोरदार पावसाने विजेच्या तारांवर झाड उन्मळून पडल्याने तारा तुटून लोंबकळत होत्या. तेव्हापासून सुमारे महिना-दीड महिन्याच्या कालावधीत कोणीही दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले नाही, असे नागरिक सांगतात.महानगरपालिका विद्युत विभागाने एकलहरे रस्त्यावरील गवळीबाबा मंदिरापासून किर्लोस्कर टेकडीपर्यंतच्या तुटलेल्या विजेच्या तारा दुरु स्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
एकलहरे रोडवर महिनाभरापासून अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:27 AM