नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठाच्या शिवारातील पंचक्रोशीत ‘जाणता वाघोबा’ अभियान यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर नाशिक पश्चिम वनविभागाने वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने सिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत माहिती व जनसामान्यांमध्ये जागृती करणारे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून मानव-पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करावे? बिबट्याचे जीवशास्त्र कसे आहे? पिंजरा लावून खरोखरच बिबट्याची समस्या सुटते की वाढते? अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून बिबट्याविषयीची शास्त्रीय माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जुन्नर, संगमनेरनंतर निफाडमध्ये त्याच धर्तीवर वर्षभरापूर्वी वनविभाग व सोसायटीच्या वतीने ‘जाणता वाघोबा’ हे अभियान राबविले गेले. याअंतर्गत शाळा-महाविद्यालयांमधून काही होतकरू हौशी विद्यार्थ्यांची ‘बिबट्यादूत’ म्हणून निवडदेखील करण्यात आली. या अभियानाला सायखेडा ते तारुखेडलेपर्यंत सर्वच गावांमधून चांगला प्रतिसाद लाभला. बिबट्याविषयीचे भय जनसामान्यांमधून कमी होण्यास मदत झाली. तसेच बिबट्याविषयीचे अज्ञानही दूर झाले आणि शास्त्रीय माहितीमुळे ज्ञानात भर पडली. संरक्षणाच्या उपाययोजनांची माहितीही गोदाकाठावरील गावकऱ्यांना झाली. हे अभियान मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी पूरक ठरणारे असल्याचे लक्षात आल्यानंतर पूर्व वनविभागाप्रमाणेच नाशिक पश्चिम वनविभागानेही सिन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील गावागावांमध्ये ‘जाणता वाघोबा’ अभियान राबविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच या अभियानाचा शुभारंभ सिन्नरमध्ये होण्याची चिन्हे आहेत.बिबट्या-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्नसिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याचा अधिवास आढळून येतो. अनेकदा बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होतो. बिबट्यासारख्या मार्जार कुळातील व नैसर्गिक अन्नसाखळीमधील महत्त्वाच्या वन्यप्राण्यांपैकी एक असलेल्या वन्यजीवाविषयीचे अज्ञान दूर करण्याच्या हेतूने वनविभागाकडून हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.४अभियानाचा सकारात्मक प्रतिसाद जनसामान्यांवर होत असल्याची खात्री वनविभागाला पटली आहे. बिबट्याचे जीवशास्त्र लक्षात आल्यानंतर त्याची भीती कमी होण्यास मदत होते, अशी माहिती सोसायटीचे स्वयंसेवक व अभियानाचे समन्वयक मृणाल घोसाळकर यांनी दिली.सिन्नर वनपरिक्षेत्रामध्येही मानव-बिबट्याचा संघर्ष वारंवार विविध घटनांमधून पुढे येतो. शेतकºयांचे पशुधन तसेच शेतमजूर व रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘जाणता वाघोबा’ उपक्रम राबविण्याचे विचाराधिन आहे. याबाबत वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या समन्वयकांसोबत चर्चाही झाली आहे. लवकरच या अभियानाला सुरुवात करू. नाशिक पूर्व वनविभागाकडून निफाडमध्ये हे अभियान यशस्वीरीत्या राबविले गेले आहे. त्या धर्तीवर सिन्नरमध्ये प्रयोग करण्याचा मानस आहे. - टी.ब्यूला एलील मती, उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम
‘जाणता वाघोबा’ आता सिन्नरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:40 AM