नाशिक : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’..‘बजरंगबली की जय’, ‘जय श्रीराम जय हनुमान’असा जयघोष आणि ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी नृत्याने शनिवारी (३१) हनुमान जयंती सोहळ्यात रंगत भरली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत फडकणारे भगवे ध्वज यामुळे निर्माण झालेल्या भक्तिमय वातावरणामुळे नाशिककर भक्तिरसात चिंब झाले. श्रीराम शक्तिपीठ, ब्रह्मचारी आश्रमातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाकडीबारव येथून शनिवारी भगवान श्री हनुमान यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या रथासह रामभक्त हनुमानाचे रूप दाखविणाऱ्या चित्ररथाने रामभक्तांसह बजरंगबलीच्या उपासकांचे व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हनुमान जन्मस्थळ अंजनेरी येथील प्रज्वलित करून आलेल्या ज्योतीसह हनुमान भक्तांनी सहभाग घेतला. यावेळी आनंद आखाड्याचे सागरानंद सरस्वती महाराज, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी, श्रमिक रिक्षाचालक संघाचे अध्यक्ष भगवान पाठक, महेश सोपे, दिगंबर मोगरे आदी उपस्थितीत होते. यावेळी वाकडी बारव येथे जमलेल्या हनुमान भक्तांनी जय श्रीराम, जय हनुमानचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. दूधबाजारातील गणपती मंदिरात पूजन झाल्यानंतर ही मिरवणूक मेनरोड, एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा मालेगाव स्टॅण्डमार्गे निघालेली ही मिरवणूक रामकुंडावर नेण्यात आली. दुतोंड्या हनुमानाची आरती करत मिरवणुकीची सांगता झाली.पुष्पवृष्टी, रांगोळ्यांनी स्वागतरामभक्त हनुमानाची मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत केले. या मिरवणुकीत जिवंत देखाव्यांसह हनुमानाची भव्य मूर्ती लक्षवेधी ठरत होती. या मूर्तीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
जय बोला हनुमान की...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 2:09 AM