हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाशकात जय श्री राम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:44 IST2025-04-04T21:43:50+5:302025-04-04T21:44:10+5:30
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सपकाळ हे प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाशकात जय श्री राम!
संजय पाठक,
नाशिक- अयोध्येतील श्री राम मंदिराचा मुद्दा वेळोवेळी राजकारणात गाजतो. त्यामुळे नाशिकला महायुती किंवा महाविकास आघाडीचे नेते आले तर ते श्री काळाराम मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. कॉंग्रेसचे नुतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येत्या रविवारी(दि.६) नाशिकला येणार असून ते देखील श्री काळाराम मंदिरात भेट देऊन जय श्री राम म्हणणार आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर सपकाळ हे प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच दिवशी रामनवमी असून त्यामुळे ते नाशिकच्या प्रसिध्द आणि पुरातन श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. अयोध्येतील श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले तेव्हा त्यांनी श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन मंदिरांच्या स्वच्छता सेवेचा शुभारंभ केला होता. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी देखील भेट दिली होती.
अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाणिवपूर्वक येथे हजेरी लावली आहे. त्यामुळे आता हे मंदिर राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे चर्चेत असते. रविवारी रामनवमी असून दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाला ते उपस्थित राहातील. आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाणार आहेत.