नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख उमेदवारांनी भल्या सकाळी देवदर्शन घेऊन कौल मागितला. यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शिर्डी येथे जाऊन साईचरणी नतमस्तक झाले, तर नाशिकमध्ये समीर भुजबळ हे काळाराम मंदिरात प्रभू रामचंद्रांना साकडे घालण्यासाठी गेले होते. त्याचप्रमाणे भद्रकाली येथील शनि महाराजांसह अन्य ठिकाणीदेखील देवदर्शन केले. विशेष म्हणजे श्रींसाठी सौदेखील पुढे झाल्या आणि त्यांनीदेखील पूजा अर्चा केली.नाशिक लोकसभा निवडणुकीचा कौल यंदा बांधणे कठीण दिसत होते. त्यामुळे प्रमुख उमेदवार आपणच विजयी होऊ, असा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वांनाच धाकधूक होती. अर्थात, हेमंत गोडसे हे निकालाच्या दिवशी देवदर्शनापासूनच सुरुवात करीत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशाचप्रकारे देवदर्शन केले होते. त्यामुळे यंदादेखील निकालाच्या आदल्या दिवशी रात्रीच ते शिर्डी येथे गेले होते. पहाटे ४ वाजता साईबाबांच्या काकड आरतीला उपस्थित राहून त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली त्यानंतर ते नाशिकला आले. नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिर आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे जाऊनही त्यांनी दर्शन घेतले. हेमंत गाडसे यांच्या कुटुंबीयांनीदेखील सकाळपासूनच देवधर्म सुरू केले होते. गोडसे यांच्या पत्नी अनिता यांनीदेखील संसारी गावातच हनुमान मंदिरात पूजा अर्चा केली.राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीदेखील सकाळी नाशिकमध्ये प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विजयासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ या उपस्थित होत्या.
गोडसे साईचरणी, भुजबळ यांचे जय श्रीराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:03 AM