नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो अथवा माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन नाशिकमधील शिवसैनिकांनी केले आहे. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतरदेखील सध्या नाव आणि पक्षचिन्ह असलेल्या शिवसेनेच्या म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजनदेखील नाशिकच्या शिवसैनिकांकडेच असून, त्यामुळे नाशिकचे पदाधिकारी अयोध्येस रवाना झाले आहेत.
येत्या रविवारी (दि. ९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येस जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीकाठी ते महाआरतीदेखील करणार आहेत. या दौऱ्यात राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मात्र, या महत्त्वाच्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेचे पक्ष सचिव भाऊसाहेब चौधरी, नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्याकडे असून, ते रवाना झाले आहेेत. नाशिकमधील अन्य कार्यकर्ते आज सायंकाळी विशेष रेल्वेने अयोध्येसरवाना होणार आहेत.