येवला : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा वेतनश्रेणी लागू करण्यासाठी संप चालू असून, शासन त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कर्मचारी सभा संघटनेच्या महिलांनी शहर पोलीस ठाणे येथे आंदोलन करून अटक करून घेतली. आंदोलनकर्त्या महिलांचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साबरे यांनी केले.अंगणवाडी कर्मचारी सेविका व मदतनीस यांना वेतनश्रेणी लागू करावी, मानधनामध्ये वाढ करावी या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने ११ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू आहे.यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मानधन वाढ झालीच पाहिजे, वेतनश्रेणी लागू झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. मागे केलेल्या आंदोलनावेळी दिलेल्या आश्वासनांची पुर्तताही झाली नाही. यावेळी आंदोलनामध्येशीतल शेटे, ताई भोरकडे, मधुबाला जाधव, आशा दराडे, कुमुद कुलकर्णी आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी भाग घेतला होता.
अंगणवाडी सेविकांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:25 AM