सटाणा (जि. नाशिक) : प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावरील पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या सहा वर्षीय पहिल्या आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त बुधवार, दि. १५ जूनपासून जैन कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेवांच्या जगातील सर्वात उंच प्रतिमेची निर्मिती जिल्ह्यातील मांगीतुंगी येथे झाली आहे. या विशाल प्रतिमेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक सहा वर्षांनी महामस्तकाभिषेक केला जाणार आहे. त्याचे आयोजन दि. १५ जूनपासून होणार आहे. दुपारी २ वाजता विशेष पूजन नीतिश कुमार जैन यांच्या हस्ते होणार आहे.
महोत्सवासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच धर्मस्थळ कर्नाटक येथील जैन समाजाचे भारतातील सर्वोच्च श्रावक शिरोमणी धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आले आहे.
ध्वजारोहणाने प्रारंभ
महोत्सवाचे ध्वजारोहण १५ तारखेला सकाळी ८ वाजता कमल ठोलीया (चेन्नई) यांच्या हस्ते होणार आहे. प्रथम कलश जम्बूप्रसाद जैन, गाजियाबाद हे करणार आहे . द्वितीय कलश विद्याप्रकाश, संजय, अजय जैन, दिवान सुरत निवासी हे करणार आहेत. या महोत्सवासाठी परमपूज्य आर्यिका ज्ञानमती माताजी, डॉ. प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी यांचे व्हर्चुअल सान्निध्य लाभणार आहे.