नाशिक : शिवजयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काही ठिकाणी शिवचरित्रावर व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी बनविले किल्लेइंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकवृंदाने किल्ले बनवून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी लढाई करून विविध किल्ले जिंकले. तसेच किल्लेही बनविले आहेत. त्या किल्ल्यांचे सर्वांनाच आकर्षण आहे. त्यामुळे नेहमीच संस्थांच्या वतीने किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्यात येतात. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून आज शाळेच्या प्रांगणात माती, पुठ्ठ्यासह विविध साहित्यांद्वारे किल्ले बनविण्यात आले होते. यामध्ये प्रतापगड, शिवनेरी, जंजिरा, सिंहगड, सिंधुदुर्ग, तोरणा, रायगड, पुरंदर, राजगड आदि किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापक नितीन पाटील, प्राचार्य बाबा खरोटे, कविता पवार, मनीषा बोरसे, सरला सोनवणे, सुचिता कंसार, सुनील जाधव, संदीप नागरे, भारती जाधव, आदि शिक्षकांनी सहभाग घेतला होता.