त्र्यंबकेश्वर : निसर्ग संपत्तीने नटलेल्या तालुक्यात उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांवर पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधार्थ भटकंती करण्याची वेळ येते. किलबिलणारे पक्षी आणि अन्नाच्या शोधात गावकुसाकडे आगेकूच करणारे प्राणी यांच्या संवर्धनासाठी जलपरिषद मित्रांनी पशूपक्षी संवर्धन उपक्रम हाती घेतला आहे. नाशिक - हरसूल या राज्य महामार्गावरील वाघेरा घाटात पशू, पक्ष्यांसाठी मुबलक पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हरसूल परिसर हा उंच-सखल डोंगरदऱ्यांचा भाग आहे. त्यात वाघेरा घाट सदाहरित आणि सृष्टीसौंदयाने नटलेला आहे. पावसाळ्यात या घाटातील माळरानासह कड्याकपारीत वाहणारे छोटे - मोठे धबधबे सर्वांनाच आकर्षित करतात. यामुळे दूरवरून येणाऱ्या पर्यटक, नागरिकांना याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. त्यात दाट धुकेही आनंद द्विगुणीत करते. मात्र, उन्हाळ्यात याउलट अवस्था निर्माण होत असल्याने पशू-पक्ष्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.
मनुष्याबरोबर तहानलेल्या पशू-पक्ष्यांना पाणी आणि अन्न मिळावे, यासाठी जलपरिषद मित्रांनी टाकाऊ वस्तूंपासून वाघेरा घाटात पशू-पक्ष्यांसाठी पशूपक्षी संवर्धन उपक्रम हाती घेऊन जवळपास स्वखर्चाने ७० ते ८० ठिकाणी पाणी आणि अन्नाची सोय केली आहे. यामुळे घाटात सद्यस्थितीत पशू-पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. जलपरिषद विविध उपक्रम राबवत असून, पशू-पक्षी संवर्धन उपक्रमाने यात भर घातली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला श्रमदानातून उभारी देण्यात आल्याने परिसरात कौतुक होत आहे. हरसूल - नाशिक राज्य महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन पशू-पक्ष्यांच्या या संवर्धन उपक्रमासाठी पाणी आणि मूठभर धान्य संकलनासाठी हिरिरीने सहभाग व्हावे, असे आवाहन जलपरिषदेकडून करण्यात आले आहे.यावेळी देवचंद महाले, प्रकाश पवार, अरुण बागले, सीताराम पवार, अनिल बोरसे, दिनेश लहारे, विशाल महाले, विष्णू पवार, दिलीप पवार, नितीन पाडवी, मधुकर हिरकुड, विकास आवारी, अशोक तांदळे, पांडुरंग तांदळे, विठ्ठल मौळे, रोहिदास बोरसे, केशव पवार आदी जलपरिषद मित्र उपस्थित होते.जलपरिषद मित्रांच्या संकल्पनेतून हरसूल शहरात रिकाम्या टाकाऊ वस्तू जमा करण्यात आल्या. हरसूलच्या सरपंच सविता गावित, महाले एंटरप्रायझेसचे विशाल महाले, मोतीराम इंगळे, हिरामण इंगळे, प्रशांत वाघचौरे यांनी या उपक्रमाला मोठा हातभार लावला आहे. जल परिषदेकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.वाघेरा घाटात विविध प्रकारचे पक्षी आढळून येत आहेत. कधी-कधी वेगवेगळ्या हंगामात विदेशी पक्षीदेखील पाहावयास मिळतात. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. यामुळे घाटात पक्ष्यांसाठी पशू-पक्षी संवर्धन उपक्रम राबविला आहे. पशू-पक्ष्यांबद्दल सर्वांनीच सहकार्याची भावना ठेवून या उपक्रमाला श्रमदानातून हातभार लावावा.- पोपट महाले, जलपरिषद मित्र, हरसूल.