त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जल परिषद मिशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जवळपास ११११ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २१ दिवस ही मोहीम चालणार आहे.त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तसेच दिंडोरी तालुक्यासह तालुक्याच्या ग्रामीण व अतिदुर्गम भागांत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जल परिषद मिशनतर्फे ११११ वृक्षांचे रोपण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेअंतर्गत ५ जून ते २५ जुलैदरम्यान ग्रामस्थांच्या श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेवगापाडा येथून शेवगा जातीच्या ११ वृक्षांसह पाच केशर आंब्यांची लागवड करून झाली. तालुक्यातील अनेक ठिकाणे ही पर्यटकांना पावसाळ्यात खुणावत असून, पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. दिवसेंदिवस जंगलांचा होणारा ऱ्हास ओळखून जल परिषद मित्र परिवाराने यावर्षी मिशन १०१ वनराई बंधारा, पशु-पक्षी संवर्धन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ११११ वृक्षांचे वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घेतली. जल परिषद मित्र परिवाराचे हिरामण शेवरे, एकनाथ भोये, देवीदास कामडी, नितीन गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, रतन चौधरी, योगेश महाले, देवचंद महाले, पोपट महाले, अनिल बोरसे, संजय गवळी, रतन बागुल, अशोक तांदळे, हुशार हिरकुड, केशव पवार, हिरामण चौधरी, नामदेव पाडवी, नेताजी गावित, मनीषा घांगळे, विठ्ठल मौळे, प्रकाश पवार, सीताराम पवार, गणेश सातपुते, प्रल्हाद पवार, ज्ञानेश्वर गावित आदींच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.महिलांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभजल परिषद मित्र परिवाराने ११११ वृक्षांचे ५० दिवसांत वृक्षारोपण करण्याचा संकल्प ठेवला आहे. शेवगापाडा येथून या मोहिमेचा महिलांच्या हस्ते केशर, आंबा वृक्षाचे रोपण करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी झाडाचे पूजन व औक्षण करण्यात आले.दिवसेंदिवस ग्रामीण भागातील चोरट्या जंगलतोडीमुळे तसेच शहरी भागातील वाढत्या औद्योगिकरणामुळे झाड, जंगलांचा ऱ्हास होत आहे. जल परिषद मित्र परिवाराने वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे.- पोपट महाले, जलमित्र.