वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार या गावी लोकसहभाग व जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्या शेष निधीतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन अनिल पाटील व गटविकास अधिकारी बहिरम यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच प्रशांत बागुल, माजी सरपंच रामदास खैरनार, उपसरपंच पोपट खैरनार, काकळीज ग्रामसेवक, हरिभाऊ खैरनार, बाजीराव खैरनार, अमृता वाघ, संतोष बागुल, सुनील खैरनार, शेतकी अधिकारी सोनवणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सततच्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या बळीराजाला शेतात काम नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती झाली होती. आता काय करायचे या संभ्रमावस्थेत बळीराजा असताना स्थानिक तरुण आणि गावकऱ्यांनी गावाच्या उत्तरेस बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पाच हजार रु पये द्यायचे व ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांनी पूर्ण काम होईपर्यंत ट्रॅक्टर द्यायचे. स्थानिक होतकरू तरुण व लोकसहभागातून सुरू केलेले हे काम एक महिना चालले. शेवटी पिचिंग व सांडव्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील यांच्या शेष निधीतून चार लाख असा भरीव निधी उपलब्ध झाल्याने बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. शासनाच्या नियमाप्रमाणे हे काम ३० ते ३५ लाखांचे आहे; परंतु तेच काम स्थानिक तरुण व लोकसहभागातून फक्त १० ते १५ लाखात पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात हे काम पूर्ण झाले. गावाच्या विकासात धरणामुळे नक्कीच फायदा होईल, असे मत गटविकास अधिकारी बहिरम यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, पहिल्याच पावसात हा बंधारा भरला असून, पाणी सांडव्यावरून वाहत आहे. या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ५.१४ दशलक्ष घनफूट असल्याने परिसरात या पाण्याचा चांगला फायदा होणार आहे. अथांग भरलेल्या या बंधाऱ्याचे नामकरणही करण्यात आले. यासाठी अमृता वाघ यांची दोन एकर जमीन बुडाली आहे. त्याची पर्वा न करणाऱ्या अशा दिलदार शेतकऱ्याचे नाव अनिल पाटील यांनी ‘अमृतसागर’ असे केले आहे.या बंधाऱ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे बाजीराव खैरनार, योगेश बागुल, संतोष बागुल, बापू बागुल, शेखर खैरनार, हरीश खैरनार, चेतन गांगुर्डे, रामदास जाधव, मच्छिंद बागुल, प्रकाश बागुल, जितेंद्र बागुल, कैलास शेवाळे, रवींद्र जाधव, ज्ञानेश्वर खैरनार, जगदीश खैरनार, प्रदीप खैरनार, वामन गांगुर्डे, त्र्यंबक गांगुर्डे, शरद खैरनार, चेतन खैरनार, ललित गांगुर्डे, राजेंद्र खैरनार, गोविंदा वाघ, पंडित खैरनार, पोलीसपाटील किरण खैरनार, गोरख गांगुर्डे, योगेश बागुल, वाल्मीक बागुल, नीलेश बागुल, गणेश बागुल या सर्व तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे. (वार्ताहर)
वटार येथील बंधाऱ्याचे जलपूजन
By admin | Published: July 21, 2016 12:28 AM