जळगाव नेऊर : येथील कला-संस्कृती पैठणी दालनाच्या समोरील काटवनात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
गेली पंधरा दिवसापासुन मुखेड फाटा, देशमाने परिसरात लहान वासरे,कुत्र्यांवर हल्ला केल्याने परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज भाग बदलुन बिबट्या फिरत असल्याने सध्या पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून शेतकरी पाणी भरण्यासाठी घाबरत असून गट समुहाने पाणी भरतांना शेतकरी दिसत आहे.
मुखेड फाटा येथील रमेश गावडे यांच्या वासराला चार पाच दिवसापूर्वी बिबट्याने जखमी करून सोडले होते तर देशमाने येथील राठोड वस्तीवर कुत्र्यांचा फडशा पाडल्यानंतर बिबट्याने आपला वावर मुखेड फाटा, जळगाव नेऊर परिसरात केला आहे. वन विभागाने देशमाने शिवारात पिंजरा लावला असून बिबट्याची दहशत परिसरामध्ये कायम आहे.
मौजे देशमाने येथे राठोड वस्तीवर पिंजरा लावण्यात आलेला असून,नागरिकांनी रात्री व पहाटे घराबाहेर पडतांना काळजी घ्यावी,अफवांवर विश्वास ठेवू नये ,पाळीव जनावरे बंदिस्त बांधावीत,बिबट दिसल्यास वनविभागाला संपर्क करावा त्याचा फोटो घेण्याच्या प्रयत्नात त्याचा पाठलाग करु नये.- प्रसाद पाटील, वन विभाग, येवला.