देवळा : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामीण जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय व सार्वजनिक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छता करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षा रक्षक यांच्या मदतीने जलकुंभाची स्वच्छता करण्यात येणार असून, हातपंपाची दुरुस्ती व शुद्धीकरण आदी कामे अभियानात करण्यात येणार आहे.पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून, टीसीएल पावडरची उपलब्धता, वाटप नियोजन व कार्यवाहीबाबतची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.---------------------------१ जूनपासून सुरू झालेल्या अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील १८९ शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शिक्षकांनी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने कोरोनाबाबत खबरदारी घेत पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. सार्वजनिक जलकुंभाच्या दर्शनी भागात पक्क्या रंगांनी जलकुंभ स्वच्छतेची तारीख प्रदर्शित करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.- सुनीता धनगर,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती
साथरोग रोखण्यासाठी जलकुंभ शुद्धीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:55 PM